श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या (नार्को-टेरर) जाळ्याचा पर्दाफाश केला. त्या महत्वपूर्ण कारवाईत 10 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. त्यानंतर विविध भागांतून त्या टोळीच्या सदस्यांना पकडण्यात आले.
त्यातील तिघे पंजाबचे रहिवासी आहेत. संबंधित टोळीकडून 9 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याची किंमत तब्बल 45 कोटी रूपये असल्याचे समजते. त्याशिवाय, चीनी बनावटीच्या ग्रेनेड आणि पिस्तुलांचा साठाही हस्तगत करण्यात आला.
इतर जप्तीमध्ये अडीच लाखांची रोकड, 1 लाख रूपयांचा धनादेश आणि 4 वाहनांचा समावेश आहे. अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचा साठा सीमेपलिकडून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीनंतर नार्को-टेरर टोळीचे आणखी काही सदस्य पोलिसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे.