Infosys shares Fall: कंपन्यांकडून डिसेंबर तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. या तिमाही निकालानंतर कंपन्यांच्या शेअर्सवरही याचा परिणाम दिसून येत आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअर्सला देखील याचा फटका बसला आहे. बीएसई इंडेक्सवर कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात जवळपास 6 टक्के घसरण दिसून आली.
शुक्रवारी (17 जानेवारी) इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 5.77 टक्क्यांनी घसरून होऊन किंमत 1815.10 रुपये होती. शेअर्सच्या किंमती घसरल्यामुळे इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि प्रमोटर एनआर नारायण मूर्ती यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे जवळपास 1900 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
नारायण मूर्ती यांच्या कुटुंबाकडे इन्फोसिसमध्ये एकूण 4.02% हिस्सेदारी आहे. यात नारायण मूर्तींकडे 0.40 टक्के, त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडे 0.92 टक्के, त्यांचा मुलगा रोहन यांच्याकडे 1.62 टक्के, मुलगी अक्षता यांच्याकडे 1.04 टक्के आणि नातू एकाग्र रोहन मूर्तीकडे 0.04 टक्के हिस्सेदारी आहे. एकाच दिवसात शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने त्यांच्या शेअर्सचे मूल्य 30,334 कोटी रुपये होते.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसच्या नफ्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्यात 11.4 टक्क्यांनी वाढ होऊन 6806 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नफा 6,106 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 4.6 टक्क्यांच्या वाढीसह 6,506 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
एकीकडे तिमाहीत नफा झाला असला तरीही कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. यामागचे कारण न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड असलेल्या इन्फोसिसच्या अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्टमध्ये झालेली घसरण हे आहे. याचाच फटका कंपनीच्या शेअर्सला बसत आहे.