मुंबई – -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भाजपच आहे, अशा आशयाचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याविषयीची माहिती नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचे वाटत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. मात्र, त्यांच्या वक्तव्याशी शरद पवार यांनी असहमती दर्शवली. एक राष्ट्रीय पक्ष पाठीशी असल्याचे शिंदे यांनी म्हटल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य विधानसभेत ठरेल. आघाडी विधानसभेत बहुमत सिद्ध करेल. बंडखोरांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीत आघाडी सरकारचे भवितव्य ठरणार नाही. बंडखोरांना इकडे यावेच लागेल, अशी परखड भूमिका पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नारायण राणे यांनी ट्विट केले की,’माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत,‘सभागृहात येऊन दाखवा’,ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.’ त्यांचा या ट्विटवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा या ट्विट वरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.