मार्चमध्ये ठाकरे ‘आउट’ भाजप ‘इन’ – राणेंचा दावा; पण हे शक्य आहे का? वाचा आकडेवारी…

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच हे सरकार लवकरच पडणार असल्याची भविष्यवाणी भाजपचे अनेक नेते करताना दिसतायेत. मात्र अद्याप तरी भाजप नेत्यांची सरकार पडण्याबाबतची कोणतीच भविष्यवाणी खरी ठरली नसून ठाकरे सरकार लवकरच आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. अशातच आता महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची नवी डेडलाईन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी विद्यमान सरकार पुढील वर्षी मार्चमध्ये कोसळेल असा दावा केलाय. राणे यांनी सरकार पडण्याची नवी डेडलाईन दिल्यानंतर राणेंचा दावा खरा ठरणार की याआधी इतर भाजप नेत्यांनी दिलेल्या डेडलाईन्सप्रमाणे ही तारीख देखील हवेतच विरणार अशी चर्चा सुरु झाली आहे. 

काय म्हणाले राणे?

राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, “राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही.” असा दावा केला.

आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही

“माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही,” असंही राणे म्हणाले.

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया  

दरम्यान राणे यांनी सरकार पडण्याची नवी तारीख जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी नावावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांनी राणे यांना टोला लगावताना, ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं वक्तव्य केलं.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राणेंचं नाव न घेता, “भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची भविष्यवाणी खोटी ठरू लागली आहे. त्यावर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही. राज्यातलं सरकार ५ वर्ष चालेल.” असा टोला लगावला.

आकडेवारी काय सांगते

राज्यातील माहाविकास आघाडी सरकार कोसळायचे असल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यातील एका पक्षातून ३४ ते ३८ आमदार फोडावे लागतील. एकाच वेळी एकाच पक्षातून ३४-३८ आमदार फोडण्यात यश आले तरच पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होणार नाही. मात्र इतके आमदार एकाचवेळी फुटणे शक्य नसून पक्ष बदलल्यास निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याचं आमदारांना माहिती आहे. राज्यात सध्या तीन पक्ष एकत्र असल्याने या पक्षांतून फुटलेले आमदार पुन्हा निवडून येतील का? असा देखील प्रश्न असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.            

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.