मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर आता सिंधुदुर्गात नारायण राणेंना शिवसेनेने मोठा झटका दिला आहे. सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा झटका मानला जात आहे.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार करत येड्यांची जत्रा अशी उपमा दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे. भविष्यात कणकवली मतदारसंघातील नितेश राणे यांचे निष्ठावंत म्हणवणारे अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतील आणि कणकवली शिवसेनामय होईल, असा दावाही करण्यात येतोय.