अनंत गीतेंनी पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले,”त्यांनी मांडलेला मुद्दा…”

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार   आमचे नेते नाहीत असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेने या प्रकरणापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणी आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे असे सागंत त्यांची बाजू घेतली आहे.

“अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठीच झाली आहे. यामध्ये हिंदुत्वाचा आणि निष्ठेचाही भाग नाही. शिवसेनेने तर मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्त्वाला मूठमाती दिली. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, अनंत गीतेंनी सांगितलं ते १०० टक्के खरं आहे,” असे नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, गीते यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, यावर बोलताना राणे म्हणाले, “अजून काय वाकडं करू शकतात. गीते यांना कदाचित फासावर लटकवतील. यांना दुसरं काय येतं. अनंत गीतेंची जी अवस्था आहे तीच शिवसैनिकांची आहे. कोणीच त्यांना विचारत नाही”. अनंत गीतेंचं चुकतंय कुठे अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.