ईशान्य भारतात पारंपरिक युध्दपध्दतीकडे लक्ष केंद्रीत करणार

जनरल नरवणे यांचे संकेत; सामरिक अभ्यासकांचे विधानावर विचारमंथन सुरू

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील बंडखोरी, दहशतवाद विरोधी उपाय योजना आणि अंतर्गत सुरक्षा यावरून लक्ष कमी करून ईशान्य भारतातील पारंपरिक युध्दपध्दतीवर येत्या अडीच वर्षात लक्ष केंद्रीत करण्याचे संकेत जनरल मनोज नरवणे यांन दिले. या भागातून लष्कराच्या दोन बटालीयन यापुर्वीच कमी करण्यात आल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जनरल नरवणे म्हणाले, बोडोलॅंड प्रादेशिक परिषदांच्या निवडणुका संपल्या की आम्ही आणखी सैन्य मागे घेऊ. पुढील अडीच वर्षात आम्ही पारंपरिक युध्दपध्दतीवर लक्ष केंद्रीत करणार आहोत.
आसाम सरकार आणि बोडो बंडखोरांमध्ये शांतता करार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी नरवणे यांनी हे विधान केले आहे.

चांगले घडण्यासाठी ईशान्य भारत बदलाच्या स्थित्यंतराच्या मार्गात

ईशान्य भारतातील सेवेचा प्रचंड अनुभव पाठीशी असणारे नरवणे म्हणाले, चांगले घडण्याच्या दिशेने सध्या ईशान्य भारत हा स्थित्यंतराच्या मार्गातून जात आहे. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड आणि अन्य गटांच्या 600 जणांनी अलीकडेच आत्मसमर्पण केले. हे तेथील सुरक्षा स्थिती सुधारत असल्याचे हे निदर्शक आहे.

जम्मू काश्‍मिरमधील स्थितीबाबत विचारले असता लष्करप्रमुखांनी नेमके पणाने उत्तर दिले नाही. ते म्हणाले, पारंपरिक युध्दपध्दती हीच आमची प्रमुख जबाबदारी आणि दीर्घ कालीन उद्देश असेल. तर दहशतवादाचा मुकाबला हे अल्पकालीन उद्दीष्ट असेल. कलम 370 काढल्यानंतर तेथील शस्त्रसंधी उल्लंघनांच्या घटनांत वाढ झाली अहे. तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्था मात्र सुधारली आहे.

पाकिस्तानने दहशतवादी घटना घडवण्याच्या प्रयत्नात वाढ झाली असून काश्‍मिरातील परिस्थिती सुधारत असल्याने त्यांच्या नैराश्‍यात वाढ झाली आहे. दगडफेक, झटापट आणि बॉम्बस्फोटाच्या घटनांत कपात झाली आहे, असे जनरल नरवणे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.