आळंदी – नृसिंह जयंतीनिमत्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून नृसिंहाचा आवतार साकारला होता. सायंकाळी सहा वाजता हा अवतार भाविकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकालावधीत भाविकांच्या महापूजा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
नृसिंह जयंतीनमित्त शनिवारी (दि.14) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता घंटानादाने दिवसाची सुरूवात झाली. सव्वाचार वाजता काकडा आरती, पवमान पूजा व दुधारती झाली. त्यानंतर पाहटे साडे पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन खुले करण्यात आले होते. नैवद्याकरिता दुपारी बारा ते साडे बारा या वेळेत दर्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत भाविकांना पुन्हा दर्शन सुरू करण्यात आले.
दुपारी अडीच ते सायंकाळी सहा या वेळेत संजीवन समाधीवर चंदनउटीतून नृसिंह अवतार साकारण्यात आले. या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी श्रींच्या चल पादुका कारंजे मंडपात ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी चार वाजता मंदिरात मान्यवरांचे प्रवचन झाले. त्यानंतर सायंकाळ पाच ते सात या वेळेत वीणा मंडपात वै. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतने श्रीनृसिंह जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर वीणा मंडपात श्रीनृसिंह जन्म उत्सव साजरा करण्यात आला. रात्री साडे आठ वाजता श्रींची धुपारती झाल्यानंतर रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत संतोष मोझे यांच्या वतीने जागर करण्यात येणार आहे.