राहुरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावात 5 वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला असता तिची आई आल्याने नराधमाने धूम ठोकली. नशीब बलवत्तर म्हणून चिमुरडी वाचली. पीडित बालिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार याच्यावर अपहरण, बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. माणुसकीला काळीमा फासणार्या या घटनेने जिल्ह्यात संताप व्यक्त केला आहे.
शनिवारी दि. 18 जून रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान 5 वर्षीय चिमुरडीचे आई-वडिल बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन किशोर ऊर्फ केश्या विजय पवार (रा. आरडगाव) या नराधमाने त्या बालिकेला तिच्या घरातून उचलून नेले. आरडगाव परिसरात असलेल्या शेतात नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. कापडाच्या सहाय्याने गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने लांबूनच केश्या पवारला पाहिले.
तिने धावत जाऊन ताबडतोब त्या नराधमाला जागेवरच पकडून आरडाओरड केली. पीडित बालिकेचे वडिल येत असल्याचे पाहून नराधमाने बालिकेच्या आईला ढकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या बालिकेचा जीव वाचला. त्या बालिकेला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, उपनिरीक्षक एस.बी. देवरे, राहुरी पोलिसचे उपनिरीक्षक निरज बोकील, सज्जन नार्हेडा आदी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस पथकाने आरोपीला गजाआड केले.
पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा करीत आहेत.