ऑस्ट्रेलियन ओपन : नाओमी ओसाकाला जेतेपद

दुसऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन : अंतिम फेरीत ब्रॅडीचा पराभव

मेलबर्न : –ऑस्ट्रेलियन ओपन 2021 च्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकाने मिळवले आहे. तिने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीचा पराभव करत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद आपल्या नावावर केले. ओसाकाने ब्रॅडीला अंतिम सामन्यात 6-4, 6-3 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत हे विजेतेपद मिळवले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओसाकाचे कारकिर्दीतील हे एकूण चौथे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिने 2018 आणि 2020 साली अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. तर 2019 साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले होते.

ओसाकाने उपांत्य फेरीच दिग्गज सेरेना विल्यम्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर 22 व्या मानांकित ब्रॅडीने कॅरोलिना मुचोवाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ब्रॅडीचा हा पहिलाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना होता. एक तास सतरा मिनिट चाललेल्या अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये ब्रॅडीने ओसाकाच्या तोडीचा खेळ करत 4-4 अशी बरोबरी साधली होती. मात्र, त्यानंतरचे दोन्ही गेम ओसाकाने जिंकत पहिला सेट आपल्या नावावर केला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र ओसाकाने ब्रॅडीला कोणतीही संधी न देता वर्चस्व राखले. तिने पहिले चारही गेम जिंकत 4-0 अशी आघाडी घेतली. पण यानंतर ब्रॅडीने पुनरागमन करत पुढचे 2 गेम जिंकले. पण ओसाकाने तिचे वर्चस्व कायम राखत 5-2 अशी आघाडी वाढवली. ब्रॅडीनेही नंतर एक गेम जिंकला. पण अखेर ओसाकाने आपल्या सर्व्हिसवर पुढचा गेम जिंकला आणि सेट 6-3 असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे ओसाकाचा हा सलग 21वा विजय होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.