नाणे मावळ – नाणे मावळातील विविध गावांच्या हद्दीत असलेली डोंगर माथ्यावरील रहिवासी स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही अनेक वर्षे झालीत तरीही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे पठार, कांबरे (ना. मा) पठार, करंजगाव पठार, पाले पठार, उकसान पठार, कुसवली-कुसूर पठार, कांबरे (आं.मा.) पठार व त्याचबरोबर सटवाई वाडी आदी गावांचा समावेश होतो.
पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या भागात सध्या रस्त्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. पठारावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावरील मुरुमाचा भराव वाहून गेला.
नागरिकांना पावसाळ्यात पायपीट करावी लागते. मात्र आता रस्ता खराब झाल्याने त्यांची पायपीट थांबणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत प्रशासनाने ठोस पावले टाकली पाहिजेत, अशी मागणी विठ्ठल शेडगे, नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे आदी ग्रामस्थांनी केली आहे.