‘नांदूर मधमेश्‍वर’ महाराष्ट्रातले पहिले ‘रामसर स्थळ’

जागतिक संघटनेच्या पर्यावरण विभागाकडून दर्जा प्राप्त 


पक्ष्यांचा अधिवास संरक्षित करण्यासाठी मदत

पुणे – ओडिशामधील चिल्का तलाव हे भारतातील पहिले “रामसर स्थळ’ आहे. या तलावाला 1981 मध्ये “रामसर’ दर्जा प्राप्त झाला होता. तर, नुकतेच नांदूर मधमेश्‍वरच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिले “रामसर स्थळ’ मिळाले आहे. राज्यातील लोणार सरोवरालाही “रामसर दर्जा’ मिळावा, यासाठी वनविभाग आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास असलेल्या पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनासाठी जागतिक संघटनेच्या पर्यावरण विभागाने 1975 मध्ये “रामसर’ परिषदेची स्थापना केली. या परिषदेंतर्गत जगभरातील महत्त्वाच्या पाणथळ स्थळांना रामसर हा आंतरराष्ट्रीय दर्जा दिला जातो. देशातील सर्वाधिक रामसर स्थळे ही उत्तर प्रदेशात असून त्यांची संख्या सात इतकी आहे. या पाठोपाठ उत्तराखंड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात या राज्यांचा समावेश होतो.

उत्तराखंडमधील आसान संवर्धन अभयारण्यालाही रामसर हा दर्जा प्राप्त झाल्याने भारतातील “रामसर’ हा दर्जा प्राप्त झालेल्या ठिकाणांची संख्या आता 38 इतकी झाली असून देशात पक्ष्यांच्या अधिवास संरक्षित करण्यासाठी यातून मोठी मदत मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

इतक्‍या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची स्थळे असणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश ठरला आहे, असा दावा केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान विभागाने केला आहे.

रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झालेल्या पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच, त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक, तज्ज्ञांची मदत मिळण्यासाठी हा दर्जा महत्त्वपूर्ण ठरतो, असे मत पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.