नांदेड – स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून भक्तांना फसविणाऱ्या भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा बाबा गुप्तधन, कुटुंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करण्यात तरबेज होता. नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी हा बाबा आहे.
कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले असे या बाबाचे नाव असून या बाबासह त्याच्या तीन साथिदारा विरोधात गु्न्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या बाबाने डोंबिवली आणि पुण्यासह अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
मागील तीन वर्षांपासून माहूर येथे टीनशेट उभारून या भोंदूबाबाने अघोरी कृत्य सुरू केले. गुप्तधन शोधून देणे, कुटुंबातील सदस्याला नोकरी लावणे, कौटुंबिक कलह दूर करणे, आजार बरे करणे यासाठीच दत्तप्रभूंचा अवतार म्हणून आलो असल्याचे तो भक्तांना सांगत होता. त्यासाठी मांडूळ, कासवाची पूजा करीत असे. यज्ञ करून त्याची राख खायला देणे, यज्ञात भाविकांचे रक्त टाकून रक्ताभिषेक करणे, असे अघोरी कृत्य तो करीत होता. त्यासाठी भक्तांकडून बाबाने लाखो रुपये उकळले.
डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर हे बाबाचे भक्त होते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भोंदूबाबाने तब्बल 24 लाख रुपयांचा गंडा घातला. तर पुण्यातील एकाची अशाच प्रकारे फसवणूक केली.
शेरकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांची भेट घेतली. त्यांनंतर त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विश्वजित कपिले याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा केला.