नांदेड : नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसने ठराव एकमताने पारीत केला आहे. जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. यावर सर्वांचे एकमत झाले आहे. फक्त आता याची अधिकृत घोषणा बाकी आहे.
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता दाट झाली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवडणुकीतील प्रचार व इतर सर्व बाबींचा नियोजनात रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा होता. मधल्या काळात त्यांनी काँग्रेसकडे विधानसभेसाठीही अर्ज केला होता. परंतु वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनानंतर पक्षातर्फेच रवींद्र चव्हाण यांनी पोट निवडणूक लढवावी अशी भूमिका घेण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारुन नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत वसंतराव चव्हाण यांनी विजय खेचून आणला होता. 26 ऑगस्ट रोजी वसंतराव चव्हाण यांचे अकाली निधन झाले होते.