नांदा सौख्यभरे

प्रिय चि. सौ. बबू,

आज सासरी जाऊन महिना झाला बाळा तुला! तुझं तक्रार वजा रुसवा असलेलं पत्र मिळालं. स्वतःचं मन मोकळं करायला मोबाइलच्या काळात देखील पत्राचा वापर केलास हे पाहून बरे वाटले. बबड्या काय म्हणतायत जावाईबापू इतर घरचे सगळे?  माझं बाळ, छकुलं रुळलं की नाही अजून तिकडे? एकदा सर्वांना आपलं म्हटल की काही जड जात नाही सार कसं सोपं होऊन जातं बाळा. घर म्हटल की आनंदाचे प्रसंग येतात तसे थोडेफार ताण तणावाचेही प्रसंग येणारच! भांड्याला भांडं लागणारच आवाज होणारच पण ही पेल्यातली वादळं असतात चार भिंतीच्या पलीकडे ते जाता कामा नये ते घरातच शमलं पाहिजे. अगं वाद विवादात भांडणात आपलं काय चुकलं हे प्रामाणिकपणे पडताळून पाहावं बरेच प्रश्‍न आपोआप सुटतातच! चूक असेल तर सॉरी म्हणावं समोरचा चुकला असेल तर माफ करावं दोन्ही गोष्टींनी आपण काही लहान होत नाही उलट वाद लवकर मिटतात.

संसारात भांडण झाले तर भांडणात एकाने आग झाले तर दुसऱ्याने पाणी व्हावे! दोघांनी आग होऊन भडका उडवून देऊ नये! त्यामुळे संसार उद्‌ध्वस्त होतात. तेव्हा तेवढा प्रसंग टळे पर्यंत शांत राहावं. सारं काही प्रासंगिक असतं, तेवढ्या वेळा पुरतचं पण जर दोघांनीही अटितटीला लागून माघार घ्यायची नाही, असं ठरवलं तर छोट्याशा ठिणगीचा वणवा होतो आणि त्यात सारं काही भस्म होऊन जातं! किंवा ह्या भांडणरूपी वावटळ, वादाळात छोटी पिल्लं सुंदर घराट्यासह कधी उद्‌ध्वस्त होतात कळतही नाही! संसार करताना ईगो, स्वाभिमान बऱ्याचदा बाजूला ठेवावा लागतो. समोरच्याला तू मोठा, तुझं बरोबर, असं म्हटलं तर आपले काही नुकसान तर होत नाहीच; पण समोरचा सुखावतो आणि मग भांडणाला वावच उरत नाही. संसार यज्ञात पहिली आहुती द्यावी लागते ती अहंकाराची एकमेकांसाठीच जगायचं असतं!

वाईट प्रसंग, आठवणी या वाळूवरच्या रेघांसारख्या असाव्यात एका लाटेबरोबर वाहून जाऊन नष्ट होणाऱ्या असाव्यात तर सुखद आठवणी, प्रसंग हे काळ्या दगडावरील कोरलेल्या पंढऱ्या रेघांसारख्या कधीही न पुसल्या जाणाऱ्या सुखावणाऱ्या असाव्यात त्या निराशेच्या अंधाऱ्या वाटेवरील प्रकाश टाकणाऱ्या दिव्यासारख्या असतात, एवढे जरी लक्षात ठेवले तरी आयुष्य सरळ, सुकर जातं! समोरच्या व्यक्‍तीच्या जागी आपण असतो तर असा विचार करून वागलं तरी समोरच्याला समजून घेणं सोपं जातं. हा उपदेश नाही बाळा, प्रेमाचं सांगणं आहे, शिकवण आहे. आनंदात राहा, सुखी राहा. सुखाने संसार करा नांदा सौख्यभरे… तुझीच आई

अनुराधा पवार

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×