शिवसेना 1 मार्चला सभा घेवून स्पष्ट करणार भूमिका
रत्नागिरी – सत्तास्थापनेनंतर शिवसेनेच्या मुखपत्रात नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने शिवसेनेची भूमिका बदलली का?, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नाणारबाबत जाहीर सभा घेणार आहे. येत्या 1 मार्चला नाणार गावात ही सभा होणार असून यावेळी शिवसेना आपली भूमिका जाहीर करणार आहे.
नाणार प्रकरणी विरोधकांकडून शिवसेनेवर सडकून टीका होत आहे. शिवसेना दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. याबाबत नाणारच्या सभेत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या सभेला पक्षाचे खासदार आणि इतर नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील नाणार प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. नाणार रिफायनरी समर्थनार्थ शिवसेनेचे स्थानिक नेते एकवटले आहेत. नाणार रिफायनरीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
नाणार रिफायनरीला शिवसेना पदाधिकाऱ्यांचे समर्थन प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेनला राम-राम केलेल्या शिवसैनिकांची भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत एक गुप्त बैठक पार पडली. राजापूरमध्ये ही गुप्त बैठक पार पडली. सध्या “ऑपरेशन नाणार’ची जबाबदारी आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, सामूहिकरित्या पक्षाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. येत्या बुधवारी दिल्लीत ही भेट होणार असल्याची शक्यता आहे.