बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला स्पायमास्टर रामेश्वर नाथ काव यांच्या जीवनावर आधारित वेबसीरिज आणि एक फीचर फिल्म साकारत आहेत. यात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे आर. एन. काव यांनीच भारतात गुप्तहेर यंत्रणा “रॉ’चा पाया घातला होता. काव हे “रॉ’चे पहिले प्रमुखही राहिले आहेत.
याबद्दल नाडियादवाला म्हणाले की, पाच वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि तो 20 भागातील वेबसीरिजमधून सादर करणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसेल आणि बाकी कलाकार आणि क्रू मेंबर्सना निश्चित केले जात असल्याची त्यांनी पुष्टी दिली. वेबसीरिज आणि चित्रपटासाठी दोन्ही कलाकार एकसारखेच असतील, असेही त्यांनी नमूद केले.
हा चित्रपट आणि सीरिज अनेक वास्तविक घटनांवर आधारित असेल. तो “रॉ’च्या इतिहासासह त्याची स्थापना आणि काव यांच्या अनेक मोहिमा दाखविण्यात येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला नोव्हेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने काव यांच्यावर चित्रपट बनविण्याची घोषणा केली होती. तसेच निर्माता सुनील बोहरा हेही स्पायमास्टरच्या जीवनावर आधारित एका थ्रिलर वेबसीरिजला प्रोड्यूस करत असल्याचे समजते.