अभिनेत्यांबाबत योग्य वाटतंय ते नाना बोलले : अजित पवार

मागच्या सरकारच्या चुका काढण्यात काडीमात्र अर्थ नाही : अजित पवार

पुणे – यूपीए सरकारवेळी पेट्रोलचे दर वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी टीका केली होती. आता तिच परिस्थिती आहे. देशात पेट्रोलचे भाव शंभरीवर गेले आहेत. असे असताना ते दोघेही काहीच बोलत नाहीत. म्हणून त्यांच्या चित्रपटांचे शुटिंग राज्यात होऊ देणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नानांच्या मनात जे आले असेल ते बोलून गेले. ते महत्त्वाच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना जे योग्य वाटतेय ते त्यांनी केले.

पेट्रोल दरवाढीला तत्कालिन सरकार जबाबदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, “एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालत नाही. मागच्यांनी काय केले, हे सरकारने सांगण्यात काडीमात्रही अर्थ नाही. तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय. मागच्यांनी केलेल्या चुका दुरूस्त करून लोकांना कशी मदत होईल, हे त्यांनी पाहिले पाहिजे.’

“देशात पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या किंमती वाढत असताना गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यातून त्रासून गेला आहे. या किंमती जेव्हा वाढतात तेव्हा सगळीकडूनच महागाई आगडोंब उसळतो. पेट्रोलचे दर हे कमीच झाले पाहिजे ही माझीच नसून प्रत्येकाची भावना आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.