नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नानंतर विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांवर भूखंडाबाबत आरोप केल्याचे दिसून आले. त्यामुळे आजचा दिवसही चांगलाच वादळी ठरणार हे निश्चित होत. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत विधानसभेत बोलू देण्याची मागणी केली. यावरून एकच गोंधळ सुरु झाला आणि विरोधकांनी अखेर सभात्याग केला.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्यावरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेरलं आहे. रश्मी शुक्ला यांना सरकारने क्लीनचीट दिलं. पण कोर्टाने या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामुळे शुक्ला यांना क्लीनचिट देणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना केली आहे.
तत्पूर्वी, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे फोन टॅपिंग प्रकरणात बोलू देण्याची मागणी केल्यानंतर अध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारली. यानंतर अध्यक्ष सरकारला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित अपवर यांनी केला. आपल्या अधिकाराचा वापर करून आपलीच बाजू योग्य कशी आहे. हे सांगण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणत अजित पवार यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.