विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारताच
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी निगडीत प्रश्न सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. लोकांच्या हिताच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाला सभागृहात जोरदार विरोध करत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आवाज उठविला जाईल, अशा शब्दांत नाना काटे यांनी आज (गुरुवारी) सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून नाना काटे यांनी आज पदभार स्विकारला.
पदभार स्विकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत काटे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, चांगल्या कामांना आम्ही कधीच विरोध केलेला नाही. केवळ विरोधासाठी विरोध करणे, हे आमचे धोरण नाही. मात्र नागरिकांच्या हिताऐवजी वेगळाच प्रकार सत्ताधाऱ्यांनी चालविला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी एकटा नसून आमचे 38 नगरसेवक सत्ताधाऱ्यांची चुकीची कामे हाणून पाडतील. कचरा, पाणी, रेडझोन, अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के परतावा, शास्तीकरासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.