शारजा – कर्णधार गेरहार्ड इरासमसचे नाबाद अर्धशतक व जेन ग्रीन व डेव्हीड विसे यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर नामिबियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर नामिबियाने यंदाच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य फेरीत म्हणजेच सुपर 12 गटात थाटात प्रवेश केला.
आयर्लंडचा कर्णधार अँड्रयु बालबिरेनने नाणेफेक जिंकून प्रतम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय नामिबियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. पॉल स्टर्लिंग 38, केविन ओब्रायन 25 व कर्णधार अँड्रयु बालबिरेन 21 यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दोनअंकी धावा करता आल्या नाहित. त्यांचा डाव 20 षटकांत 8 बाद 125 असा रोखत नामिबियाने सामन्यावर सुरूवातीपासून वर्चस्व राखले. नामिबियाकडून जेन फ्रॅंकलिनने 3 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना डेव्हीड विसे याने 2 बळी घेतले. जेजे स्मिथ व वर्नार्ड शुल्टझ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना नामिबियाच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. मात्र, क्रेग विल्यमस अनावश्यक फटका मारून 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार इरासमसने जेन ग्रीनच्या साथित संघाचा डाव सावरला. ग्रीनही स्थिरावलेला असताना 24 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मात्र, इरासमसने डेव्हीड विसेला साथीला घेत संघाला विजय मिळवून देताना आयर्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची अखंडीत भागीदारी केली व संघाला 19 व्या षटकांत 126 धावा करत विजय मिळवून दिला. या विजयासह त्यांनी या स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. आयर्लंडकडून कर्टिस कॅंफरने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – आयर्लंड – 20 षटकांत 8 बाद 125 धावा. (पॉल स्टर्लिंग 38, केविन ओब्रायन 25, अँड्रयु बालबिरेन 21, जेन फ्रॅंकलिन 3-21, डेव्हीड विसे 2-22, वर्नार्ड शुल्टझ 1-25,जेजे स्मिथ 1-27). नामिबिया – 18.3 षटकांत 2 बाद 126 धावा. (क्रेग विल्यमस 15, जेन ग्रीन 24, गेरहार्ड इरासमस नाबाद 53, डेव्हीड विसे नाबाद 28, कर्टिस कॅंफर 2-14).