मुंबई : 12 जुलै रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले तर राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांकडून क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले. यामध्ये ७ आमदारांचा समावेश आहे. या सातही आमदारांचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीतील हाय कमांड कडे पाठवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. या घातकी गद्दार लोकांना काँग्रेस मधून बाहेर काढले जाईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. आता ते 7 आमदार कोण ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आता हे सात आमदार कोण असतील याची शक्यता समोर आली आहे.
‘या’ 7 आमदारांनी केले क्रॉस वोटिंग
फुटलेल्या आमदारांपैकी विदर्भातील 1, मराठवाडातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 आमदार तर एक मुंबईतील 1 आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व आमदारांवर संपूर्ण महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आग पाखड केली जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याची शिफारसही करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हे आमदार नेमके कोण आहेत, त्यांची नावे सध्या समोर आली आहेत.
या 7 आमदारांमध्ये हिरामण खोसकर, शिरीष चौधरी, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे यांचा समावेश आहे. नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅप मध्ये अडकलेले सात आमदार हेच असल्याची सूत्रांची माहिती आहे. जर खरंच याच सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले असेल, आणि तसे जर पक्षांतर्गत चाचणीत समोर आले, तर पक्षाकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.