पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील दोन्ही नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून गेल्या चार वर्षात काहीही उपाय योजना झाल्या नाहीत. राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या पिंपरी-चिंचवड पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आयुक्तांना निवेदन देत शहरातील पवना व इंद्रायणी नद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव द्या. किमान त्यांच्या नावासाठी तरी सत्ताधारी नदी प्रदूषण रोखण्यासाठी काम करतील, असे उपरोधिक निवेदन आयुक्तांना दिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पवना व इद्रायणी या दोन नद्या वाहतात. सद्यस्थितीत नद्यांना गटारांचे स्वरूप आले आहे. जलपर्णी साठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानादेखील नद्यांना गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे यावेळी पर्यावरण अहवालावर सुद्धा चर्चा झाली, आणि तो फक्त कॉपी पेस्टचा माहिती अहवाल आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघ शहर अध्यक्ष माधव पाटील, कार्याध्यक्ष युनूस शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष अभिजित घोलप आदी उपस्थित होते.