मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे सांगितले. तसेच आजपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यातच राज ठाकरेंनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा भोंग्यांविरोधातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे सांगितले आहे.
राज ठाकरेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलेली नाही. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे भाषणादरम्यान, “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, बंद” असं म्हणताना दिसत आहेत.
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022
दरम्यन, त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून राज ठाकरेंनी बाळासाहेबांची जी भूमिका मशिदींवरील भोंगे आणि अजान विषयी होती तीच भूमिका आपली देखील असल्याचे स्पष्ट केले आहे.