नवी दिल्ली – राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांच्यावर आज वायएसआर कॉंग्रेसच्या एका सदस्याने पक्षपातीपणाचा आरोप केल्याने ते आज चांगलेच व्यथित झालेले दिसले. ते म्हणाले की मी पुर्ण निष्पक्षपातीपणाने कामकाज करीत आहे. या घटनात्मक पदाची जबाबदारी आपल्या अंगावर आल्यानंतर मी भाजपचा राजीनामा दिला आहे. मी शरीराने येथे आहे मनाने त्यांच्या बरोबर आहे (भाजप) असे जर कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. मी देशाबरोबर आहे, देशाच्या घटनेबरोबर आहे आणि देशातील लोकांच्या बरोबर आहे असे त्यांनी निक्षुन सांगितले.
तुम्हाला जर माझ्या कामकाजाविषयी काही आक्षेप असेल तर तुम्ही माझ्या विरोधात अविश्वास ठराव आणू शकता. तो तुमचा अधिकार आहे पण मला गप्प करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाहीं अशी समजही त्यांनी संबंधीत सदस्याला दिली. आपल्यावर करण्यात आलेल्या टिपणीने एक माणूस म्हणून मला खूप वाईट वाटले असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
तेलगु देसम पक्षाच्या एका सदस्याने काही दिवसांपुर्वी सभागृहात बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याची बाब वायएसआर कॉंग्रेसचे सदस्य विजय साई रेड्डी यांनी आज उपस्थित केली. त्यांचे हे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी अध्यक्ष नायडू यांच्याकडे केली. त्यावेळी ही बाब तपासून आपण त्यावर निर्णय घेऊ असा प्रतिसाद नायडू यांनी त्यांना दिला. पण त्याने रेड्डी यांचे समाधान झाले नाही. ते त्यावर बोलतच राहिले. त्यानंतर त्यांचा माईक बंद करण्यात आला. त्यावेळी अध्यक्ष पक्षपातीपणा करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नायडू व्यथित झालेले दिसले.