चंदीगड : हरियाणात सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायब सिंग सैनी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याशिवाय 12 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अनिल विज, कृष्णा बेदी, कृष्णलाल पनवार, अरविंद शर्मा, कृष्णा मिड्डा, महिपाल धांडा, मूलचंद शर्मा, श्रुती चौधरी, लक्ष्मण यादव, राव नरबीर, सुनील संगवान आणि सावित्री जिंदाल यांना हरियाणाच्या नव्या भाजप सरकारमध्ये मंत्री केले जाऊ शकते.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) स्पष्ट बहुमत मिळवून एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवले आहेत. राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी नायबसिंग सैनी पुन्हा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील नायब सिंग सैनी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह एकूण 13 मंत्री असतील.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या प्रश्नावर नायबसिंग सैनी म्हणाले, मी कधी शपथ घेणार याबद्दल मला काहीही माहिती नाही. माझे जे कर्तव्य होते ते मी केले, आता विधीमंडळ पक्ष कोणाची निवड करेल हे निरीक्षक पाहतील. मला या विषयावर काहीही बोलायचे नाही. संसदीय मंडळाचा जो आदेश असेल तो शिराधार्ह असेल. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे. आमचे संसदीय मंडळ जो निर्णय घेईल ते आम्ही मान्य करू, त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे.