न्यूयार्क : मुंबई दहशतवादी हल्ल्याला काल 14 वर्ष पूर्ण झाले. या काळ्या दिवसाचे स्मरण करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय अमेरिका आणि जपानमधील लोकांनी मृतांचे स्मरण करून पाकिस्तानचा निषेध केला.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीय अमेरिकन आणि दक्षिण आशियाई प्रवासी न्यूयॉर्कमधील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासासमोर निदर्शने केली. ह्यूस्टन, शिकागो येथील पाकिस्तान वाणिज्य दूतावास आणि न्यू जर्सी येथील पाकिस्तान कम्युनिटी सेंटरसमोरही निदर्शने करण्यात आली.
26/11 च्या विरोधात वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेकांनी रस्त्यावर निदर्शने केली. अनेकांनी हा दहशतवादी हल्ला आयएसआय प्रायोजित असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अनेकांनी’न भूलेंगे, न ही माफ करेंगे’ अशा घोषणा दिल्या.
जपानमध्येही टोकियोमधील पाकिस्तानी दूतावासासमोर जमलेल्या लोकांनी मुंबई हल्ल्याचा निषेध करत पीडितांना श्रद्धांजली वाहिली. या काळात लोकांनी हाफिज सईदविरोधात निदर्शनेही केली.