नागठाणे (प्रतिनिधी) – नागठाणे, दि. 28 (प्रतिनिधी) – बोरगाव येथे शनिवारी करोनाबाधित रुग्ण सापडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेच. मात्र संबंधित बाधित हा नागठाणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता, त्यामुळे बोरगावच्या या बाधितामुळे नागठाणेही हादरुन गेले आहे.
बोरगाव (ता. सातारा) येथील एका युवकाचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागठाणे परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ करोना रुग्ण सापडलेल्या परिसरपासून 250 मीटरचा परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला.तसेच बाधिताच्या अतिसंपर्कातील एकूण 15 जणांना क्वारंटाइन केले आहे.
बाधित युवक हा बोरगाव पोलीस ठाण्याच्या मागील बाजूसच आपल्या नातेवाईकांकडे राहावयास होता. तो एका खाजगी संस्थेत पिकअपवर चालक म्हणून कामाला होता. संस्थेचे साहित्य घेऊन तो महाबळेश्वर, महाड (कोकण) येथे डिलीव्हरीसाठी जात होता. काही दिवसांपूर्वी कणकण व खोकला असल्याने प्रथम शेंद्रे येथे उपचारासाठी गेला होता. त्यानंतर तो गावातीलच खाजगी दवाखान्यातही उपचारासाठी गेला. मात्र प्रकृती न सुधारल्याने नागठाणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. तेथे तीन दिवस उपचार करूनही काहीच फरक न पडल्याने त्याला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
प्रशासनाने तात्काळ बोरगाव येथे धाव घेत बाधिताच्या घरापासूनचा 250 मीटर परीघ क्षेत्र मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केला असून त्यामध्ये बोरगाव पोलीस ठाण्याचाही समावेश झाला आहे. आरोग्य विभागाने तात्काळ या परिसरातील लोकांची तपासणी मोहीम हाती घेतली. बाधिताच्या घरातील व शेजारी अतिनिकट सहवासातील 15 जणांना तात्काळ पानमळेवाडी येथे क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तर बाधिताच्या संपर्कात आलेल्या शेंद्रे, बोरगाव व नागठाणे येथील डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सासपडेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास
सासपडे (ता. सातारा) येथे दुबई येथून आलेल्या एकाचा करोना रिपोर्ट शनिवारी रात्री पॉझिटीव्ह आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. परंतु सदर व्यक्ती हा याठिकाणी आलाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती दुबई येथून आला होता. पण सासपडे येथे न येता सातारा येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन होता. तिथूनच त्याला त्रास झाल्याने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.