नागपूर – अश्लील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे काऊन्सिलिंगसाठी येणाऱ्या शेकडो महिला, मुली आणि तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या पत्नीलाही सहआरोपी करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तांनी विशेष टीम तयार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय आरोपी असलेला मानसोपचार तज्ज्ञ हा नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होता. तो महिला, मुली आणि तरूणींचे अश्लील फोटो काढून व व्हिडीओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. मागील 7 ते 8 वर्षांपासून त्याचे हे कारनामे सुरू होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबर आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडे येणाऱ्या एका तरुणीला तिचे त्या काळचे काही फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. मानसोपचार तज्ज्ञाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेने अखेर पोलिसांकडून तक्रार दाखल केली.
यानंतर आणखी तीन पीडित मुलींनी आणि महिलांनी आरोपी मानसोपचार तज्ज्ञाविरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवाणगी तुरुंगात करण्यात आली आहे.