फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे, काड्या करणे जिरवणे ही काँग्रेसची परंपरा : नितीन गडकरी

नागपूर – देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे भाजपा नेते नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होतं. असा खळबळजनक दावा काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रतिक्रिया दिली आहे.

एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. आघाडी सरकारमध्ये ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांना कोणी मोजत नसल्याने उलटसुलट वक्तव्ये करून ते स्वतःकडे लक्ष वेधत असल्याचा टोला गडकरी यांनी लगावला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी काल देगलूर येथील प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होतं असे वक्तव्य केले होते. यावर गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. आघाडी सरकारमध्ये ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांना कोणी मोजत नसल्याने उलटसुलट वक्तव्ये करून ते स्वतःकडे लक्ष वेधतात. वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे.

वडेट्टीवार यांच्या भाषणाची क्लिप पाहून आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात. असेही ते म्हणाले.

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत.

राज्यात सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही गडकरी यांनी यावेळी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.