नागपूर : रस्त्यावरून हवेत उडालं ‘भूत’? घटना सीसीटीव्हीत कैद, जाणून घ्या सत्य

नागपूर – नागपूरातील शताब्दी नगर भागात सध्या एका भुताची चर्चा चांगलीच रंगली आहे. भूत रस्त्यावरून हवेत उडाल्याचा दावा केला जात आहे. ही घटना एका घरातील सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जाताना दिसत असून ते भूत असल्याचा दावा परिसरातील रहिवाशी मेश्राम कुटुंबीयांनी केलाय.

या घटनेसंदर्भात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. अंनिसने व्हिडीओत दिसणारे भूत नसून प्लास्टिकची वस्तू असल्याचे सांगत मेश्राम कुटुंबीयांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे.

शताब्दी नगर भागात राहणारे ऑटो चालक राजेंद्र मेश्राम यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये 19 जुलैला रात्री साडेबारा वाजता एक प्रतिमा कैद झाली. ती प्रतिमा जमिनीवरून हवेत उडत जात असल्याचे दिसते. यावरून ते भूत असल्याची मेश्राम कुटुंबीयांनी मनात भिती धरली. त्यांच्या घरा शेजारी एक पडके घर आहे. अनेक दिवसांपासून तेथे कोणीही राहत नाही. त्याच्या बाजुलाच एक विहीर असून एक वर्षापूर्वी तेथे एका मुलीने आत्महत्या केली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे परिसरात भुत असल्याची अफवा पसरली.

मात्र, अंनिसचे कार्यकर्त्यांनी मेश्राम यांच्या घरी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेच तपासले आहेत. तपासात ते भुत नसून एखादी वस्तू किंवा पक्षी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भुत अस्तित्वात नसून ते आपल्या डोक्यात आहे. जर कोणी हे भूत असल्याचे सिद्ध केल्यास 25 लाख रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.