नागपूर – करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागपूर शहरात (दि. १५) आजपासून आठवडाभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याच पार्शवभूमीवर आज सकाळपासूनच पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहेत.
तब्बल १०० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करीत आहेत. सध्या तरी पोलीस लोकांवर सक्ती करी नसून समजावून सांगत आहेत. ओळख पत्र पाहून लोकांना सोडले जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
लॉकडाऊन काळात खासगी कार्यालये बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालये पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
तसेच, मद्यविक्रीची दुकाने लॉकडाऊनमध्ये बंद राहणार असली तरीही त्याची ऑनलाइन विक्री सुरु राहणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील. यावेळी ओळखपत्र बाळगणे आवश्यक असेल, असेही नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी काहीदिवसांपूर्वी सांगिले होते.