अमरावती – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ माजली होती. सुसाईड नोट सापडली असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
सुसाईड नोटमध्ये दीपाली चव्हाण यांनी काही वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार त्यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक (डीएफओ) शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली आहे. शिवकुमार हे घटनेनंतर शुक्रवारी नागपूर रेल्वे स्थानकातून कर्नाटककडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये बसत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवकुमार यांना घेऊन आधी अमरावती येथे आणि नंतर धारणी येथे नेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास शिवकुमार यांच्या वरिष्ठांची देखील चौकशी केली जाईल, असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डाॅ. हरीबालाजी एन यांनी सांगितले आहे.
मूळच्या सातारच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियक्ती झाली होती. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करून सोडले होते. त्यातून त्यांची “लेडी सिंघम” अशी ओळख झाली होती. त्यांनी आत्महत्या केली हे अनेक अधिकारी अजूनही मानायला तयार नाहीत.
RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे दीपाली चव्हाण यांनी केले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य प्रधान वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सुसाईड नोट लिहून त्यात DFO विनोद शिवकुमार त्रास देत असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे.
धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी सुसाईड नोटबद्दल माहिती दिली आहे.
“DFO विनोद शिवकुमार हे गावकरी आणि इतर कर्मचाऱ्यासमोर अश्लील शिवीगाळ करतात, अपमान करतात. करण नसताना रात्री भेटायला बोलावतात. त्यांचे ऐकले नाही की निलंबनाची धमकी देतात,” असे दीपाली चव्हाण यांनी चार पानांचा सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.
“यापूर्वी रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई केली नसल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. IFS अधिकारी ही IFS अधिकाऱ्यांचीच बाजू घेणार असाही उल्लेख चिट्ठीत करण्यात आला आहे. गर्भवती असतांना मला ट्रॅकवर बोलावले जायचे. गर्भवती असतांनाही मालूरच्या कच्च्या रस्त्यावरून मुद्दामून फिरवले जायचे. त्यामुळे माझा गर्भपात झाला. तरीही मला ड्युटीवर बोलावण्यात आले. ‘अट्रोसिटीच्या’ धमक्या मिळायच्या. चार महिने जेलमध्ये गेल्यावर कस वाटेल अशाही धमक्या दिल्या जायच्या,” असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
“DFO शिवकुमार हे नेहमी माझे आर्थिक आणि मानसिक नुकसान कसे होणार याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे. अनेकदा त्यांनी मला एकटे बोलावून माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्जीने वागत नसल्यामुळे ते त्रास द्यायचे. माझे वेतन त्यांनी रोखून धरले. माझ्या मृत्यूनंतर तरी रोखलेले वेतन तात्काळ काढावे आणि याचा लाभ माझ्या आईला द्यावा,” अशी विनंती दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या स्यूसाईड नोट मध्ये केली आहे.
पती राजेश मोहिते यांना शेवटच्या कॉलवर तुमच्यासाठी खिचडी करून ठेवते तुम्हाला शेवटच बघायचे आहे, असे म्हणून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.