शेवगाव (प्रतिनिधी ) : यावर्षी निसर्गाने कृपादृष्टी केली. सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. पिकेही ही सध्या जोमात आहेत . तरीही करोनाचे सावट असल्याने कुठेही नाग पंचमीची धामधूम आढळली नाही .
श्रावणात येणारा नागपंचमी हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी नवीन विवाह झालेल्या सासरवाशीनी माहेरी येतात. पंचमीच्या आगोदर चांगले चार-पाच दिवस हाताला मेंहदी लावून तयारी करतात.
नागपंचमीची गाणी म्हणत फेर धरून रात्री उशीरापर्यंत अनोखा आनंद लुटतात. खेडयातील प्रत्येक गल्लीत महिलांचे फेर रंगतात. नागपंचमीला गल्लोगल्लीतील व गावठाणातील कित्येक झाडावर लहान मोठे झोके बांधले जायचे. मग उत्साही मुला-मुलीच्या झुंडी प्रत्येक झोक्याचा आस्वाद घेत फिरत . काही ठिकाणी झोके चढविण्याची शर्यत लावून बक्षीसेही लावली जात . मात्र करोनाने या सर्व वर विरजन टाकले आहे.
यावेळी करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणी घराबाहेर पडले नाही . एकत्र येवून फेर धरले नाहीत . नागपंचमीची गाणी झाली नाहीत. कुठे लहानग्यांच्या हट्टापायीसुद्धा झोके बांधल्याचे दिसले नाही.