पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू सुमित नागलने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उप-उपांत्यपूर्व फेरीत नेदरलॅंडच्या टीम वान रिजथोवेन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरणचा 4-6, 7-5, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद केली.
22 वर्षीय जागतिक क्रमवारीत 324 व्या स्थानी असलेल्या रिजथोवेनने प्रजनेशपेक्षा वरचढ खेळाचे प्रदर्शन केले. 2 तास 10 मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये प्रजनेशने सुरेख सुरुवात करत हा सेट रिजथोवेनविरुद्ध 6-4 असा संघर्षपूर्णरित्या जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या रिजथोवेनने कमबॅक करत प्रजनेशविरुद्ध हा सेट 7-5 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये रिजथोवेनने आक्रमक व चतुराईने खेळ करत हा सेट 6-3 असा सहज जिंकून प्रजनेशचे आव्हान संपुष्टात आणले.
भारताच्या सुमित नागलने रशियाच्या ईवान नेदेल्को याचा 2-0 असा पराभव केला. ईवान नेदेल्को याला पाठीच्या दुखापतीमुळे सामना सोडावा लागला. भारताचा खेळाडू रामकुमार रामनाथनने तुर्कीच्या केम ईलकेल याचा 6-3,6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
भारताचा ससी कुमार मुकुंदने तुर्कीच्या एर्गी किर्रकीन याचा 6-0,6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या मनिष सुरेशकुमारला ऑस्ट्रेलीयाच्या दुसऱ्या मानांकित जेम्स डकवर्थ यांच्याकडून 6-1,6-2 असा पराभव पत्करावा लागला. दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अर्जुन कढे व साकेत मायनेनी या जोडीने रशियाच्या बोगदान बोब्रो व इवान नाइडल्को यांचा 6-4, 4-6, 16-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
दस्तुर खुद्द रॉजर फेडररला देखील आपल्या खेळाने प्रभावीत केलेल्या सुमित नागलचा खेळ पाहण्यासाठी टेनिस शौकीनांची चांगलीच उपस्थिती या स्पर्धेसाठी होत आहे.