शेवगाव : सध्याची उन्हाची तीव्रता भासू लागली असल्याने पुढील काळात संंभाव्य टंचाईबाबतच्या उपाययोजना प्रशासनाने हाती घ्याव्यात. जलजीवन मिशनबाबतच्या सर्वाधिक तक्रारी लक्षात घेता याबाबतच्या कामासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. शासन, प्रशासन व नागरिक यांच्या मदतीने आपण टंचाईवर मात करू. मात्र चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराआमदार मोनिका राजळे यांनी दिला.
येथील तहसिल कार्यालयामध्ये आयोजित तालुका टंचाई आढावा बैठकीमध्ये आमदार राजळे बोलत होत्या. यावेळी ताजनापूर उपास सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, तहसिलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, बापुसाहेब भोसले, उमेश भालसिंग, कचरु चोथे, भिमराज सागडे, अनिल सानप, डॉ. निरज लांडे, कमलेश गांधी आदींसह सरपंच, ग्रा.पं.सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टंचाईच्या झळा तालुक्याच्या पूर्वभागात अधिक असून, बहुतेक पाणी योजना नादुरुस्त व बंद असतांना देखील टँकरबाबत अडचणी येत आहेत. तर जलजीवन योजनेची कामे पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या, नळ कनेक्शन अशी कामे प्रलंबित आहेत. त्याबाबतचे संबंधीत अधिकारी नागरिकांनाच काय पण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना देखील सापडत नाहीत. उडवाउडवीचे उत्तरे देऊन चालढकल करतात. त्याबाबतच्या तक्रारी आप्पा मडके, गणेश ढाकणे, राम केसभट, विक्रम बारवकर, वाय.डी कोल्हे, आदिनाथ कापरे, अनंता उकिर्डे, सचिन म्हस्के, संभा कातकडे आदींनी आमदार राजळे यांच्यासमोर मांडल्या.
त्याबाबत राजळे यांनी जलजीवन कामाचा आराखडा ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावावा. कामे पूर्ण झाली की नाही, याची शहानिशा ग्रामसेवकांनी करावी. बैठकीला जाणूनबुजून गैरहजर व टंचाईचे ग्रांभीर्य नसलेल्या लोकांना नोटिसा बजावण्याच्या सुचना राजळे यांनी दिल्या. गावांपेक्षा वाडीवस्तीवर पाण्याची भीषण टंचाई असून, त्याबाबत तातडीने प्रस्ताव देण्याच्या तसेच कुठल्याही परिस्थितीत अपूर्ण व तक्रारी असलेल्या कामांची बिले ठेकेदारांना अदा करण्यात येवू नये, अशा सूचना आ.राजळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मुळा पाटबंधारे विभागावर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. टेलच्या लोळेगाव, सामनगाव, मळेगाव, आखातवाडे, आपेगाव , भातकुडगाव या गावांना पाणी मिळालेले नाही. असे असताना हेडच्या देडगाव भागात मायनर उघडण्यात आले आहे. याबाबतच्या तक्रारी शिवाजी भिसे, गोकुळ पठाडे, बाजीराव कोकाटे यांनी मांडल्या. मुळाचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील देशमुख यांना धारेवर धरले. रात्री उशीरापर्यंत शहरातील पाणी पुरवठा, अतिक्रमण आदींसह विविध विषयावर चर्चा सुरू होती. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सचिन भोकरे यांनी आभार मानले.