श्रीरामपूर : क्रांतीची मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची परवा न करता आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीवीरांचे मोठे योगदान असल्याचे आ. हेमंत ओगले यांनी सांगितले.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी आ. ओगले बोलत होते. ओगले म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय जनतेच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध क्रांतीची मशाल पेटली.
त्यामुळे लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने असीम त्याग केला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा क्रांतीवीरांचे स्मरण ठेवणे, प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या क्रांतीवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भोसले, मा. नगरसेवक दिलीप नागरे, के. सी. शेळके, विलास लबडे, अशोक जगधने, डॉ. राजेंद्र लोंढे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश चव्हाणके, रितेश एडके, रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, रजाक पठाण, अमोल शेटे, सनी मंडलिक, जाफर शहा, सुरेश बनसोडे, संजय गोसावी, तीर्थराज नवले, कुंदनसिंग जुनी, सागर दुपाटी, कल्पेश पाटणी आदी मान्यवर उपस्थित होते.