नगर अर्बन बॅंक कार्यक्षम सेवा देणार -खा. दिलीप गांधी

कार्पोरेट लूक देणार

बॅंकेचा शाखा विस्तार चालू असून, सर्व शाखा स्व:मालकीच्या जागेत स्थलांतरीत करुन शाखा इमारतींना कार्पोरेट लूक देऊन नूतनीकरण करत आहोत. लवकरच गुजरात राज्यातही शाखा कार्यान्वित होणार आहे.

नगर – नगर अर्बन मल्टीस्टेट बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे करून त्याची पत निर्माण करत आहोत. एक कुटुंब एक बॅंक हे ब्रीद जपत आम्ही सतत अत्याधुनिक सेवा सुविधांद्वारे ग्राहकाभिमुख काम करत आहोत.

सभासद, बॅंक यांच्यातील संबंध वृद्धिंगत करत पारदर्शी कारभार व कार्यक्षम सेवा देण्यास बॅंक कटिबद्ध आहे, अशी ग्वाही बॅंकेचे अध्यक्ष, खा. दिलीप गांधी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर अर्बन मल्टीस्टेट बॅंकेची 108 वी सभा खा. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. या वेळी संचालक राधावल्लभ कासट, मीना राठी, साधना भंडारी, अनिल कोठारी, अशोक कटारिया, विजयकुमार मंडलेचा, शैलेश मुनोत, दीपक गांधी, अजय बोरा, दिनेश कटारिया, किशोर बोरा, राजेंद्र अग्रवाल, ऍड.केदार केसकर, मनेष साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी, सतीश शिंगटे, एम. पी. साळवे, सतीश रोकडे, राजेंद्र मुनोत, डी. के.साळवे, मनोज फिरोदिया, हेमंत बल्लाळ, सुधाकर कांडेकर, सुनील काळे आदी उपस्थित होते. बॅंकेच्या अधिकाऱ्यांसह नगर जिल्हा, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, नाशिक येथील शाखांमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी खा. गांधी म्हणाले, “” बॅंकेने ग्राहकांना अत्याधुनिक सेवा सुविधा पुरविण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी बॅंकेचे स्व:मालकीचे “थ्रिटीअर डाटा सेंटर’ व “कोअर बॅंकींग’ यंत्रणा सुसज्ज झाली आहे. “सर्वेऽपि सुखिन:सन्तू’ हेच अर्बन बॅंकेचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीनेच बॅंक वाटचाल करत अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आत्मसात करुन बॅंकेच्या सर्व 48 शाखांमधून तत्पर व नम्र सेवा देत असल्याने सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार समाधानी आहेत. नगर अर्बन बॅंक आज सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या पाठबळावर भक्कमपणे उभी आहे.

नवनवीन योजना राबवत आहोत. नवउद्योजकांना उभे करण्यासाठी राज्य सरकारच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत आर्थिकदृष्ट्‌या मागास घटकातील नवउद्योजकांना नगर अर्बन बॅंक पाच वर्षे मुदतीचे 10 लाखांपर्यंत कर्ज देणार आहे. तसेच बॅंकेच्या सभासद खातेदारांना आरोग्य विमा संरक्षणाचे कवच देणार आहे. बॅंकेच्या ठेवी सातत्याने वाढतच असून 2017-18 च्या आर्थिक वर्षात 43.20 कोटींनी ठेवी वाढल्या आहेत. बॅंकेच्या निव्वळ नफ्यामध्ये 64.28 लाखांनी वाढ झाली असून, 11 कोटी 9 लाख इतका नफा बॅंकेस झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीने सभासदांना 15 टक्के लाभांश देणार आहे.

बॅंकेचे सभासद उबेद शेख यांनी “सोशल मीडिया’द्वारे बॅंकेची बदनामी करणाऱ्या विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. बॅंकेचे ज्येष्ठ सभासद धर्मराज औटी गुरुजी यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. वार्षिक सभेचे अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी यांनी केले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष नवनीत सुरपुरिया यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)