नगर (प्रतिनिधी) – बोगस कर्ज प्रकरणे करून नगर अर्बन बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पदच्युत संचालक नवनीत सुरपुरिया यांच्यासह कर्जदार यज्ञेश चव्हाण या दोघांना आज पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचे आज अटक केली. मोरगाव येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने सर्वांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांनी ही माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहर व परिसरात काही ठिकाणी 22 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात छापेमारी केली. पुण्यातील संशयित सहा आरोपींसह नगर अर्बन बँकेच्या पदच्युत संचालक मंडळाची धरपकड सुरु झाल्याने जिल्ह्यात दिवसभर हाच चर्चेचा मोठा विषय ठरला. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्ह्यात सहभाग असलेल्या संशयित आरोपी व पदच्युत संचालकांचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, अटकेच्या भीतीने अनेकांनी पोबारा केला. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हे बोगस कर्जप्रकरण असून, संशयित घोटाळेबाजांत त्यांचेही नाव आहे. बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांनी या संदर्भात 25 जानेवारी 2021 रोजी फिर्याद दिलेली आहे.
नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आलेली आहेत. त्यात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान झालेल्या या प्रकाराबाबत कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
हे आहेत संशयित आरोपी…!
बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय-56, रा. अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे पदच्युत संचालक मंडळ, अशी यातील संशयित आरोपींची नावे आहेत.