अहिल्यानगर : कृषि निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता व लिकिंग प्रकरणी जिल्ह्यातील १२ कृषी परवाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना निलंबित केले आहेत.
रब्बी हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक कृषि निविष्ठांचा योग्य दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तालुकास्तरीय गुणनियंत्रक निरीक्षक आणि भरारी पथक यांच्यामार्फत तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तपासणी अंती निविष्ठा विक्री केंद्रामध्ये त्रुटी तसेच नियमबाह्य गोष्टी आढळल्यास कडक कारवाइ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले होते.
त्यासोबतच पूर्ण तपासणी करून विविध निविष्ठांचे नमुने काढणे, खतविक्री व्यवहार नोंदी, ज्यादा दराने खते विक्री, खतांची लिकिंग असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कृषि निविष्ठा विक्री कायदे व नियमानुसार कारवाइ करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाभरात झालेल्या तपासणीमध्ये कृषि निविष्ठा कायदा, अत्यावश्यक अधिनियम तसेच परवाने अटी व नियमानुसार त्रुटी आढळलेल्या राहुरी, नेवासा आणि कोपरगाव तालुक्यातील १२ कृषि सेवा केंद्रावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संबंधितांची सुनावणी घेण्यात आले. त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश बजावले आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना युरिया व इतर खतांसोबत लिकिंग अथवा कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असल्यास कृषि विभागाच्या टोल फ्रीवर तक्रार करण्याबाबत आवाहन केले आहे.