शिर्डी : राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय प्राप्त करून देतानाच दगा फटक्याची राजकारण करणार्या शरद पवार आणि उध्दव ठाकरेंना घरी बसविण्याचे मोठे काम केले. विकासाची साखळी मजबूत करायची असेल तर पंचायत ते संसद भगवा फडकविण्याचे आवाहन केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप प्रदेश अधिवेशनाचा समारोप अमित शाह यांच्या उपस्थित झाला.
महायुतीला ऐतिहासिक यश मिळवून दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि उपस्थित कार्यकर्त्याचे आभार मानून महाराष्ट्राच्या निकालाने देशाला नवा संदेश दिला असल्याचे उद्गारही त्यांनी काढले. विधानसभा निवडणूक ही केवळ महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हती तर, विचाराला सोडून राजकारण करणार्या उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्यासाठी होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करून एनडीएला मोठी साथ दिली. राज्यातही जनतेने केवळ भाजपलाच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही विजयी करण्याचे मोठे काम केले आहे.एकप्रकारे विकासाच्या राजकारणावर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब ठरले. सनातन संस्कृती आणि हिंदुत्वाच्या विचाराला सुध्दा राज्यातील जनतेने पाठबळ दिल्याचे सांगून ते म्हणाले की, शरद पवार हे एवढे वर्ष राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहूनही महाराष्ट्राला त्यांना पाणी देता आले नाही. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यामुक्त करू शकले नाहीत. परंतु, आपले सरकार आता येत्या काही वर्षात सिंचनामध्ये मोठे काम करणार असून, शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सुध्दा काम करणार आहे. पुढच्या निवडणूकीला सामोरे जाण्यापूर्वी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सुध्दा आपल्याला करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
2024 वर्ष भाजपला ऐतिहासिक ठरल्याचा दाखला देऊन हरियाणा, आंध्रप्रदेश, ओरिसा आणि सिक्कीममध्ये एनडीएला मिळालेले यश हे महत्वपूर्ण राहिले. आम्ही हरणारे नाही तर संघटन आणि निवडणूक जिंकण्याच्या रणनितीमुळे कार्यकर्त्यांचा विजय होतो, हे पक्षाने दाखवून दिले आहे. त्यामुळेच राज्यात दीड कोटी सदस्य संख्या पूर्ण करण्याचे उदिष्ठ ठेवा. आगामी काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका आहेत. विकासाची साखळी मजबूत करायची असेल तर, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा संकल्प या आधिवेशनातून आपण करूयात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भाषणे झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री शिवप्रसाद, रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामांची मूर्ती देऊन सन्मान
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रभू श्रीरामांची मूर्ती देऊन सन्मानित केले. स्वागतपर भाषणात मंत्री विखे पाटील यांनी हे ऐतिहासिक अधिवेशन शिर्डीत घेण्याची संधी दिल्याबद्दल पक्षनेत्यांचे आभार मानून महायुतीला मिळालेल्या यशामुळे जाणते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्री घरात बसले, असा टोला लगावला. संपूर्ण राज्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळेच महायुतीला यश मिळाले असल्याचे सांगितले.