श्रीगोंदे : राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या ५४८ डी, या राष्ट्रीय महामार्गावरील अनाधिकृत कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्यासाठी बजावलेल्या नोटिसांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग विभाग, श्रीगोंदा नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्त कारवाईत अतिक्रमणांवर हातोडा मारत कारवाईचा बगडा उचलला जाणार आहे.
यासाठी ५० जवानांचा फौजफाटासह मोठ्या पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. श्रीगोंद्यातील व्यापारी, दुकानदार आणि नागरिक या मोहिमेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
मागील काही महिन्यांपासून या भागातील अतिक्रमण हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, अतिक्रमणधारकांच्या विरोधामुळे हा निर्णय लांबणीवर पडत होता. राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्यावतीने दि.२३ जानेवारी रोजी नोटीस बजावत आठ दिवसांत स्वतःहून अतिक्रमणे काढावीत तर श्रीगोंदा नगरपरिषदेचे प्रशासक, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनीही नोकब्सीद्वारे श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील विविध रस्त्यालगतच्या अतिक्रमण धारकांनाही दि.२३ जानेवारी रोजी नोटीस बजावत सात दिवसांत स्वताःहून अतिक्रमणे काढावीत, अशी नोटिसा बजावल्या होत्या.
अखेर १३ व १४ फेब्रुवारीला ही कारवाई करण्यात येणार आहे. कायद्याचा बडगा उचलून हे अतिक्रमण हटवले जाईल आणि कोणालाही कोणतीही सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढून घेणे हिताचे ठरेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.