अकोले : लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून विरोधकांना खूपत आहे. त्यांनी आजपर्यत कधीही या योजनेची प्रशंसा केली आहे का?त्यामुळे विरोधक टीका करत राहणार आहे. आता विरोधकांना आलेले नैराश्य या लाडकी बहिण योजनेवर काढत आहे, अशी टीका करत २१०० रुपयांचा निर्णयही आपले महायुतीचे सरकार योग्यवेळी घेईल व लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण करेल, असा विश्वास महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
अकोलेतील कळसुआई महोत्सव कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ना.तटकरे बोलत होत्या. यावेळी आ.डाॅ.किरण लहामटे, पुष्पाताई लहामटे त्यांचेसमवेत होते.
तटकरे म्हणाल्या , आपल्या महायुतीचे सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली तेव्हा हे विरोधक म्हणत होते फक्त रजिस्ट्रेशन केले जाईल. त्यानंतर बहिणींना दोन, तीन महिन्याचे पैसे खात्यावर आलेवर हे म्हणे निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल. मात्र निवडणुकीनंतर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरु ठेवली आहे.
त्यामुळे आता विरोधकांमध्ये नैराश्य आले असून, हे नैराश्य ते लाडकी बहीण योजनेवर काढत आहे. महायुतीचे सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आता याचे पुढचे पाऊल हे या महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणने हे आहे, त्यासाठी सरकारचे प्रयत्न आहे. महायुतीचे सरकार लवकरच २१०० रुपयांचा निर्णयही योग्यवेळी घेऊन १५०० रुपयांप्रमाणे लाडकी बहिणींना दिलेले वचन पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.