जिल्ह्यातील शिक्षकांना कोविड लस देण्यात यावी

नगरच्या शिक्षक समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नगर – जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना सरसकट कोविड लस देण्यात यावी, अशी मागणी नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी  डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.

सध्याच्या करोनाबाधित होण्याचा वेग खूप आहे. अशावेळी जिल्ह्यातील शिक्षकांना शाळा व तालुकास्तरावरच्या कोविड केंद्रावर विविध प्रकारची कामे करण्याचे आदेश दिले जात आहेत. शिक्षक त्यांच्यावर सोपवलेल्या क्वारंटाईन केंद्रावर दिलेल्या कर्तव्यावर विनातक्रार  काम करत आहेत. त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. शिक्षकांना घरोघरी फिरून अशा बिकट परिस्थितीत वेगवेगळी सर्वेक्षणे देखील करावी लागता आहेत.

तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व इतर गुणवत्ता उपक्रमासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संपर्कात रहावे लाग आहे. ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रमात  नगर जिल्हा राज्यात आघाडीवर होता. शिवाय चेकपोस्ट व रेल्वे स्थानकावर शिक्षकांनी प्रशासनाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. एकंदर कोविड योद्धा म्हणून ही सारी कामे शिक्षक विनातक्रार पार पडतात.
परंतु यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे.

सध्या फक्त 45 वर्षे वयापुढील व्यक्तींनाच कोविड लस दिली जात असल्याने अनेक शिक्षक या अटीत समविष्ट होवू शकत नाहीत. त्यामुळे आवश्यकता असूनही शिक्षकांना सुरक्षतेसाठी लस घेता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत कार्यरत असणार्‍या सर्व शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने सरसकट कोविड लसीकरण करण्यात यावे अशी मागणी शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, संजय धामणे, नितिन काकडे, सुदर्शन शिंदे, केंद्रप्रमुख सूर्यभान काळे, वृषाली कडलग, सिताराम सावंत, भास्कर नरसाळे, संजय नळे, गणपत देठे यांनी केली आहे.

शिक्षिकांनाही करोनायोद्धा म्हणून काम करावे लागते. घरोघरी फिरून शिक्षिकांनी प्रामाणिकपणे विविध प्रकारची सर्वेक्षणे केली आहेत. घरातील महिलांचे आरोग्य चांगले असेल, तर संपूर्ण घराचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे शिक्षक-शिक्षिकांबरोबरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे प्राधान्याने लसीकरण होणे आवश्यक आहे.
डॉ.संजय कळमकर, शिक्षक नेते, नगर.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.