संगमनेर : नगर परिषदेच्यावतीने शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी व गाळे भाडेकराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली असून, या मोहिमेंतर्गत संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संजय पेखळे , प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, कर निरीक्षक दत्तू साळवे , सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ यासह नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेले ६ वसुली पथके नियुक्त केले आहे. या पथकाद्वारे मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे यांसारख्या विविध कारवाई करण्यात येत आहे.
विशेष वसुली मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेल्या पथकाद्वारे शहरातील विविध भागातील ५ मालमत्ताधारकांच्या एकूण ९ लाख ८ हजार ९७१ रुपयांच्या थकबाकीपोटी मालमत्ता जप्त करण्यात आली. शहरातील विविध भागातील सुमारे ९ नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे. सदरच्या कारवाईमध्ये संजय पेखळे, प्रल्हाद देवरे ,बाजीराव नवले, प्रणोती पवार, तुकाराम कानसकर यासह प्रदीप मावलकर, साजिद पटेल, वैष्णवी गडाख, ओंकार सहाणे, सुनील हामंद, जालिंदर हिरे, वसंत मेहेर ,भीमाशंकर वर्पे, रमेश ताजणे , कुणाल चांगरे, मच्छिंद्र काठे ,अल्ताफ शेख, विजय अभंग आदी सहभागी होते.
मार्च महिना असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली अंतिम टप्प्यात असून जे थकबाकीदार कर भरणार नाही, अशा थकबाकीदारांची नावे लवकरच वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच अशा थकबाकीदारांची नावे चौकाचौकात फ्लेक्स बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार असून, अशा थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे यासारख्या कारवाईचे स्वरूप तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदार यांनी आपल्या कराचा नगरपरिषदेत वेळेत भरणा करून नगर परिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले आहे.