शिर्डीला भरणार भूलतज्ज्ञांची परिषद

देशभरातील बाराशे तज्ज्ञ उपस्थित राहणार; विखेंच्या हस्ते उद्‌घाटन

नगर – भूलतज्ज्ञ संघटनेच्या पश्‍चिम भारतातील तज्ज्ञांची परिषद चार तारखेपासून शिर्डीला होत आहे. सात तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेला पाच राज्यांतील बाराशे भूलतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते चार तारखेला परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर जिल्हा भूलतज्ज्ञ संघटनेला 22 वर्षांनंतर अशा प्रकारची परिषद घेण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेबाबत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ, संयोजन सचिव डॉ. सुभाष तुवर, संयोजन अध्यक्ष डॉ. श्रीकांत मोने, जिल्हाध्यक्ष डॉ. विश्‍वास करमरकर, डॉ. वैजयंती बढे, डॉ. ललितराम जोशी, डॉ. किशोर खराड, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. सचिन लवांडे आदींनी पत्रकारांना माहिती दिली. साई समाधी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून ही परिषद होत असल्याने देशभरातील भूलतज्ज्ञ या परिषदेला येणार आहेत.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान आणि तेलंगणातील भूलतज्ज्ञांची उपस्थित लक्षणीय असेल, असे सांगून ते म्हणाले, की अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. व्ही. कुचेलाबाबू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत 112 वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यात देशात नावाजलेले तीस तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सात वक्‍त्यांचा समावेश आहे.

चार तारखेला कार्यशाळा आणि पाच, सहा व सात तारखेला परिसंवाद होणार आहेत. देशात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली, तेव्हा भूलतज्ज्ञ म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. विजय शेट्टी यांचे मार्गदर्शन भूलतज्ज्ञांना ऐकण्याची संधी शिर्डीच्या परिषदेत मिळणार आहे. यकृत प्रत्यारोपण तसेच अन्य अवयव प्रत्यारोपणात महत्त्वाची भूमिका बजावलेले भूलतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. विस्तारणारी क्षितिजे असे या परिषदेचे ब्रीदवाक्‍य आहे. कालसुंसगत ज्ञान, नवनवीन संशोधन, तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, हा या परिषदेमागचा हेतू आहे.

16 ऑक्‍टोबरला जागतिक भूलतज्ज्ञदिन आहे. एकाच दिवसांत एक लाख लोकांना हृदय संजीवनी क्रिया शिकविण्याचा विक्रम करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 23 तारखेला हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती भूलतज्ज्ञांनी दिली. परिषदेच्या काळात तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी नगरमध्ये तीन-चार भूलतज्ज्ञ उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)