शेवगावचे अतिक्रमणधारक पुण्याला उपोषणासाठी जाणार

शेवगाव – सरकारी जागेवर राहत असलेल्या कुटुंबांना मालकी हक्काचा उतारा मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 31) पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या राज्यातील झोपडपट्टीधारक उपोषणासाठी शेवगाव तालुक्‍यातून शेकडो अतिक्रमणधारक जाणार असल्याची माहिती नगरसेवक विकास फलके यांनी दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने सरकारी जागेवर राहत असलेल्या कुटुंबाना 4 एप्रिल 2002 च्या शासन निर्णयाप्रमाणे मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश 23 जून 2015 ला दिले आहेत. या आदेशाला तीन वर्षे झाली, तरी अमंलबजावणी झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार या जागांचे ले-आऊट तयार करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समित्या कागदावरच राहिल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत सरकारी जागा उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश असताना सरकारी जागेवर घर देण्यास प्रशासकीय यंत्रणा नकार देते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिक्रमण काढून टाकण्याबाबत शासन निर्णयाचा सरकारी अधिकारी चुकीचा अर्थ लावत आहेत. ग्रामीण भागातील 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी हा निर्णय शहरी भागासाठी लागू नाही. शिवाय हा शासन निर्णय ग्रामपंचायत अधिनियमावर आधारित असल्याने या शासन निर्णयामुळे ग्रामपंचायतीमध्ये केवळ भोगवटा सदरी नोंद होणार आहे.

येत्या शुक्रवारी सरकारी जागेवर राहत असणाऱ्या कुटुंबांना मालकी हक्काचा उतारा मिळावा, या मागणीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर श्रावणबाळ मातापिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील झोपडपट्टी धारक उपोषण करणार आहेत. त्यासाठी शेवगाव तालुक्‍यातील अतिक्रमणधारक जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)