बापूंची बांधिलकी कष्टकरी शेतकऱ्यांशी – खा. पवार

श्रीगोंदा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नागवडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. (छाया - समीरण नागवडे)

श्रीगोंदा – ‘बापू’ सदैव ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार मांडत असत. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांशी “बापूं’ची बांधिलकी होती. बापूंचे विचार आणि आदर्श मनाशी बाळगत समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्यासाठी एक विचाराने राहून सर्वांगीण विकास साधणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्‍त केली.

रविवारी (दि.23) सकाळी खा. पवार यांनी वांगदरी येथे नागवडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. खा.पवार म्हणाले, “बापूं’नी सहकारी संस्थांमध्ये कामाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला, तो जतन करणे गरजेचे आहे. बापूंचे मार्गदर्शन हा सगळ्यांचा मोठा आधार होता. त्यांना राज्यातील सहकारी कारखानदारीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. “बापू’ आमदार राहुलच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे राहुलला संधी मिळाली. बापूंची पुढची पिढी अनुराधा व राजेंद्र नागवडे समाजात चांगले काम करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बापूंच्या जाण्याने त्यांचा आधार तुटला आहे, नागवडे कुटुंबीयांना साथ देणे ही आमदार राहुल आणि सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. खा. पवार म्हणाले, बापूंच्या अंगात प्रचंड इच्छाशक्‍ती होती. ते आजारपणातून बाहेर पडतील अशी सर्वांना आशा होती, मात्र सर्व काही तुमच्या आमच्या हातात नसते. बापूंनी दाखवलेल्या आदर्श मार्गाने मार्गक्रमण करून समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, त्यांचे सर्वांशी सुसंवाद व विचारविनिमय केलेले काम आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना खा. पवार यांनी व्यक्‍त केले.

रविवारी दिवसभरात आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार अशोक पवार, अरुण कडू, प्रताप ढाकणे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आनंद कदम, प्रांजल शिंदे, रमेश खाडे, कैलास तांबे आदींनी नागवडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)