अहिल्यानगर : सामुहिक शेतीबरोबरच सामुहिक उद्योगही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत वाढत आहेत. कांदा उत्पादनात दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यातून गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंद्यातील 150 शेतकर्यांनी सोलरच्या माध्यमातून कांदा सुकविणे हे मशीन घेऊन सुरू केलेला उद्योग आता मोठे स्वरूप घेत आहे. कांद्यापासून पावडर, बरिस्ता, वाळलेला कांदा असे प्रक्रिया उत्पादन तयार करून त्यांची विक्री करण्यासाठी राज्यातील पहिले कांदा क्लस्टर श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे उभारण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून तब्बल 350 शेतकरी उद्योजक होणार असून 800 हून अधिक रोजगार उभा राहणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ऑटो इंजिनिअर क्लस्टर, गारमेंटचे दोन क्लस्टर, प्रिेटींग क्लस्टर, गोल्ड क्लस्टर असे पाच क्लस्टर उभारण्यात आले असतांना आता नव्याने अॅल्युमिनियम, स्टिल आणि कांदा क्लस्टरला शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. 8 कोटी 61 लाख रुपये कांदा क्लस्टर उभारणीसाठी मंजूर झाले असून शासन 80 टक्के तर शेतकर्यांनी उभारलेल्या संस्थेमार्फत 20 टक्के अशा प्रकारे हे क्लस्टर उभारण्यात येणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 150 शेतकर्यांनी सोलरच्या माध्यमातून कांदा सुकविण्याचे मशीन खरेदी करून गेल्या काही महिन्यांपासून सुकलेला कांदा विक्रीचा उद्योग सुरू केला. त्याला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन आता या उद्योगाला मोठे व व्यापक स्वरूप देण्याची गरज लक्षात आली. मात्र यासाठी आवश्यक असलेला पैसे उभा करणे शक्य नव्हते. अशावेळी या शेतकर्यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांच्याशी चर्चा करून कांदा क्लस्टरचा प्रस्ताव दिला.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नव्याने उद्योग उभारणीसाठी सुचना केल्या होत्या. त्यानुसार दंवगे यांनी कांदा क्लस्टर उभारणीचा प्रस्ताव मांडला. त्याला पालकमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर कांदा क्लस्टरचा प्रस्ताव तयार करण्यात आला. महालक्ष्मी ग्रामीण लाईफ असोसिएशन अशी संस्था श्रीगोंद्यातील या शेतकर्यांनी स्थापन केली. या संस्थेमार्फत प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी देण्यात आला. आता त्याला मंजूरी मिळाली असून 8 कोटी 61 लाख रुपये प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यानुसार शासन 80 टक्के तर 20 टक्के रकम महालक्ष्मी ग्रामीण लाईफ असोसिएशनाचा हिस्सा आहे.
श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही वर्षापासून कांदा उत्पादन वाढले आहे. गेल्यावर्षी 14 ते 15 हजार हेक्टर क्षेत्रात कांदा होता. तो आता 25 हजार हेक्टर क्षेत्र झाला असून सुमारे साडेसात लाख मेट्रीक टन कांदा उत्पादन होत आहे. यापूर्वी 150 शेतकर्यांना मुख्यमंत्री रोजगार योजनेतून सोलरच्या माध्यामातून कांदा सुकविण्याचे मशीन देण्यात आले होते. आता क्लस्टरच्या माध्यमातून शेतकर्यांना मोठ्या स्वरूपात कांद्यावरील प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची विक्री करता येणार आहे.
या 150 शेतकर्यांबरेाबर आणखी 200 शेतकरी या उद्योगाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तब्बल 350 शेतकरी उद्योजक होतील. या क्लस्टरमध्ये शेतकरी कांद्याच्या उत्पादनावर बाजारपेठीच्या मागणीनुसार स्वतः प्रक्रिया उत्पादन करून त्यांची विक्री करता येणार आहे. कांदा पावडर, बरिस्ता, सुकलेला कांदा याचे उत्पादन करून त्यांची पॉकिंग देखील या ठिकाणी करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या मशीनरी मिळणार असून त्या चालविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ देखील या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे 800 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ नेहमीच प्रयत्नशिल असतात. जिल्ह्यात आतापर्यंत पाच क्लस्टर उभारले गेले असून नव्याने तीन क्लस्टरला मान्यता मिळाली आहे.त्यात कांदा क्लस्टरची उभारणी होत आहे. त्यामुळे उद्योजक आणि रोजगार दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत.
– अतूल दवंगे
महाव्यवस्थापक,
जिल्हा उद्योग केंद्रग्रामीण भागातील तरूणांसह महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा. तोही पिकांच्या प्रक्रिया उद्योगातून असा विचार करीत असतांना कांदा प्रक्रिया उद्योग समोर आहे. महाव्यवस्थापक अतूल दवंगे यांनी कांदा क्लस्टर उभारणीसाठी मार्गदर्शन केल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली हे क्लस्टर उभे राहत आहे. त्यातून शेतकर्यांना आपले उत्पादन विकता येणार असून रोजगार देखील मिळणार आहे.
-संदीप लांगोरे,
संचालक
महालक्ष्मी ग्रामीण लाईफ असोसिएशन