चिमुकल्यांनी जवळून पाहिले पोलीसदादांना

स्वामी समर्थ बाल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सहल पाथर्डी पोलीस ठाण्यात

पाथर्डी – शहरातील श्री स्वामी समर्थ बाल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यात जावून पोलीस दादांना जवळून पाहण्याचा योग आला. नेहमीच चित्रपटांमध्ये दिसणारे, सीआयडी मालिकांमधून गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना बेड्या घालणारे पोलीसदादा चिमुकल्यांचे खरे हिरो आहेत. अशा आपल्या हिरोला प्रत्यक्ष पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेमध्ये मुलांना नेहमीच एक प्रश्‍न विचारला जातो. मोठा झाल्यावर काय होणार? या प्रश्‍नाला लहान मुले छाती फुगवून गर्वाने “पोलीस’ असे उत्तर देतात. अशा या पोलीस दादांची दिनचर्या कामकाजाची पद्धत छोटी छोटी मुले काळजीपूर्वक पाहून समजावून घेत होती. पोलीस दादांशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाल्याने काही मुलांनी तर चक्क खाकी वर्दीला हात लावून पाहिला. बंदूक, पिस्तूल ही हत्यारे पाहताना तर मुलांच्या चेहऱ्यावरील नाविन्यपूर्ण हावभाव पाहण्यासारखे होते.

गुन्हेगाराविषयीची भिती, त्यांच्याकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन गुन्हेगार, चोर म्हणजे खूपच वाईट माणूस ही प्रतिमा या क्षेत्र भेटीने काहीशी बदलून गेली. जेलकडे जाताना अनेक मुलांची अवस्था रडवेली झाली होती. गुन्हेगारांना प्रत्यक्ष भेटण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. उपस्थित पोलिसांनी व शिक्षकांनी अनेकदा विश्‍वास दिल्यानंतर आरोपींना लांबूनच पाहण्यासाठी चिमुरडे तयार झाले.

चित्रपट व मालिकांमधून उग्र व भेसुर चेहेरे असलेले गुन्हेगार पाहण्याची सवय असलेल्या मुलांना जेलमधली सर्वसाधारण माणसे पाहिल्यानंतर काहीसा धीर आला. जेलमधल्या संशयित आरोपींनी ही मुलांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. उपलब्ध नसतानाही चॉकलेट, खाऊचे आमिष दाखवून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शाळेतील व घरची नेहमीचीच प्रश्न विचारून बाल मनावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर तणावाची जागा संवादाने घेतली.चिमुरड्यांनी ही बोबड्या आवाजात त्रोटक संवाद साधत दोघांमधील रुंदावलेली प्रतिमेची दरी कमी केली. दोघांच्याही चेहऱ्यावर अखेर फुटलेल्या हास्याने क्षेत्रभेटीचा निरोप समारंभ पार पडला.

पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई कोण असतात. कोण काय काम करतात, आरोपी कोठे ठेवले जातात, पोलिसांच्या खजिना (हत्यारे) कोणता असतो, रजिस्टर काय असते, त्यांच्या ड्युटी कोण लावतात, त्यांची ड्युटी कशी असते, वायरलेस यंत्रणा काय असते इत्यादी विषयीची माहिती पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे समवेत पोलीस कर्मचारी स.फौ शेषराव आव्हाड, हेड कॉ. ठका भास्कर, पो ना. संदीप गर्जे, निलेश म्हस्के, किशोर पालवे, दत्ता बडदे यांनी दिली.

शैक्षणिक क्षेत्रभेट उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले , सहशिक्षिका सोनाली सोनवणे, प्रविणा गोल्हार, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, सुरज आव्हाड, कृष्णा होनमणे आदींनी परिश्रम घेत यशस्वी नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)